नवरात्र
नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. आपल्या समाजात तो इतक्या विविध प्रकारे साजरा केला जातो तो पाहून थक्क व्हायला होतं.गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे. मधला पितृपंधरवडा त्या तयारीत कधी संपतो, समजतच नाही. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती, सार्वजनिक उत्सवातही, हे सारे सोपस्कार केले जातात. घरोघरीही घटस्थापना होते. प्रत्येक घराची पद्धत निराळी. कुणाकडे उठता-बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण, सवाष्ण जेवू घालतात. कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. पूर्णाहुती म्हणून पुरणावरच स्वयंपाक असतो. बरेच जण नऊ दिवस उपवास करतात. तर कुणी धान्यफराळ करतात. एकुणात नऊ दिवस धावपळीचेच असतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. त्यासाठी गोंधळी बोलावले जातात. अर्थात यावत तेलम् त्यावत् आख्यायनम् हे आलेच.देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ असेच म्हटले जाते. एरवी, ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी तिची प्रार्थना केली जाते.भोंडला :अगदी लहान असताना, पाटावर हत्ती काढून, त्याच्याभोवती, सख्यांसंगे फेर धरून, गाणी म्हणत असू. शेवटी खिरापत ओळखण्याची मजा काही वेगळीच. नवरात्रीचे नऊ दिवस असा भोंडला घातला जाई. दररोज वेगळी खिरापत, कुणीतरी डबा वाजवून दाखवे म्हणजे आवाजाने ओळखण्याचा प्रयत्न करता येई. प्रत्येक घरी वेगळा पदार्थ असे. काही ठिकाणी पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन, अशा चढत्या क्रमाने खिरापती असावयाच्या, दसऱ्याच्या दिवशी मात्र सर्वाकडे दहा खिरापती असावयाच्या. आम्ही श्रीबालाजीची सासू असे म्हणत असू. श्री. श्रीखंड, बा-बासुंदी, ला-लाडू, जि-जिलेबी, ची-चिरोटे किंवा चिवडा, सा-साखरभात आणि सामोसे, सु-सुतरफेणी, यांपैकी काहीही असले तरी, होकार येई आणि ओळखण्याचे काम थांबून जाई. पहिल्या दिवशी, ‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा’, या गाण्याने सुरुवात होई, क्रमाक्रमाने बाकीची गाणी येत आणि शेवटच्या दिवशी, ‘आड बाई अडोणी, आडाचे पाणी, काडोणी, आडात पडला शिंपला आणि आमचा भोंडला संपला’ असे उच्च रवात ओरडत असू.नोकरीच्या निमित्ताने विदर्भात आल्यावर भुलाबाई हा प्रकार बघितला. भाद्रपद पौर्णिमेला शंकर-पार्वतीच्या मूर्ती बसवून त्यांच्यासमोर शाळकरी मुली टिपऱ्यांच्या तालावर गाणी म्हणत असत. शाळेतून आल्या आल्या हातात टिपऱ्या घेऊन, मैत्रिणींच्या घरोघर जाण्याची त्यांची लगबग गमतीची असे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी, टिपुर चांदण्यात, भुलाबाईला मखरात बसवून, आरास मांडून, पूजा केली जाई आणि बऱ्याच पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जाई. पन्नास वर्षांपूर्वी विदर्भात हे घडत असे, पण शाळांच्या वेळा, क्लासेस्चे चक्र, यातून मुलींना वेळ मिळेनासा झाला. अलीकडे फक्त कोजागरीच्या दिवशीच, भुलाबाई मांडल्या जातात. भुलाबाई हे देवीचेच रूप असून तिला गौराई म्हणता आणि ती माहेरवाशीण असते, यातील गाण्यांची सुरुवात, ‘पहिली माझी पूजा बाई, देवादेव बाई’ अशी होते नंतर, ‘पहिल्या मासेचा गरवा, कधी येशील सरवा, सरता सरता कारागरी, नंदनगावच्या तीरावरी, आंबे बहुत पिकले, भुलाबाई राणीचे डोहाळे’, अशी नऊ महिन्यांची नऊ फळे पिकतात आणि शेवटी, ‘तिचे डोहाळे तिला भारी, नेऊनी घाला पलंगावरी, तेथे शंकर बसले, शंकर आमचे मेव्हणे, दीड दिवसाचे पाव्हणे,’ अशी सांगता केली जाते. नवरात्र, देवी, ह्यंचा संबंध असा लहानपणापासून स्थापित होतो.घरामध्ये नवरात्र बसते. अखंड नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवण्यासाठी मोठा दिवा घेतला जातो, पण रात्री मध्येच उठून घरातील मोठी स्त्री, दिव्यात तेल घालते, वात सारखी करते. हायस्कूलमध्ये असताना मी पुण्यातून मराठवाडय़ात आले आणि पहिल्यांदाच ‘अश्विन शुद्ध पक्ष, अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी’ ही आरती ऐकली. आरतीचे ध्रुपद आहे, ‘उदो बोला उदो बोलो, अंबाबाई माउलीचा हो आनंदे गर्जती, काय वर्णू महिमा तिचा’ सर्वजण मिळून आरती म्हणताना, काय वर्णूच्या ऐवजी, ‘गाय वर्णू महिमा’ असे ऐकू येई आणि गाय वर्णू म्हणजे काय, हे मला उलगडत नसे. जेव्हा ती आरती शांत, स्वस्थ स्वरात ऐकता आली तेव्हा तो शब्द गाय नसून, काय आहे हे लक्षात आले.नवरात्रीमध्ये जोगवा म्हणून, बायका जोगवाही मागतात. जोगव्याची अनेक गाणी आहेत, पण परभणीला आमच्याकडे शेण देण्यासाठी, हरणाबाई नावाची बाई येत असे सडा, संमार्जनासाठी ती शेण आणून देत असे. काळा कुळकुळीत रंग, पांढरेशुभ्र दात, कपाळावर रुपयाएवढे लाल कुंकू. तिचे प्रसन्न हास्य आजही स्मरणात राहिलेले. नवरात्र सुरू झाले की फाटकातून आत शिरल्या शिरल्या, ती म्हणू लागे,‘आईचा तुळजा, देवही तुळजा,देवाच्या भगती गोंधुळ घालिती.खिरी तूप पतरी भरती,आई बसली नवराती,दहा दिसांची भरती,पाटील पांडेया मिळूनी,गाव लोक या मिळुनी,शिवलगनाला जाती,शिवलगनाला जाती,धानाचे तुरे लेती,येतील मांगिणी जोगिणीहाती कुकाचा करंडा,भांग भरिला मोत्याने,पतर भरिला तुपाने,’आणि शेवटी, ‘जोगवा वाढाहो माय’ असे ती म्हणत असे. तिचे ते गाणे, तिच्या ग्राम्य भाषेत, तिच्या तोंडून ऐकताना खूप गोड वाटे. आई मग जोगवा म्हणून, धान्य, पीठ तिच्या परडीत घालीत असे.शहरी भाषेत जोगव्याचे विविध प्रकार आहेत.‘अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी,मोह महिषासुर महिषासुर मर्दना लावूनीत्रिविध तापाची करावया झाडणी,भक्तालागी तू ऽऽऽभक्तालागी तू पावसी निर्वाणी,ऐसा जोगवा जोगवा मागेन।द्वैत सारूनी माळ मी घालीन,हाती बोधाचा झेंडा मी घेईन,भेदरहित वारिसी जाईन,ऐसा जोगवा मागेन।नवविध भक्तीच्या भक्तीच्या करितीनवरात्री, ओटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा,धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा’असा सद्गुणांचा, नि:संग होण्याचा, विकल्प, काम, क्रोध सोडून देण्याचा आणि जन्ममरणाचा फेरा चुकविण्याचा जोगवा बायका मागतात. या जोगव्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. मात्र तो समजून घेऊन, जोगवा मागितल्यास मनशुद्धी होऊन मन:शांती नक्कीच मिळेल.नवरात्रीच्या आरतीतसुद्धा,‘द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी,सकलांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी’असे म्हटले आहे. परशुरामाची जननी म्हणजे रेणुका माता अर्थात माहुरगडवासिनी. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई दुसरी तुळजाभवानी, तिसरी रेणुकामाता ही तीन पूर्ण पीठे आणि नाशिकजवळ वणीची सप्तशंृगी हे अर्धेपीठ मानले जाते. या सर्व ठिकाणी नवरात्र मोठय़ा प्रमाणात साजरे होतात. तेथे दर्शनाला जाण्याची भक्तांची धडपड असते. पण ते शक्य झाले नाही तर निदान गावातल्या देवीच्या दर्शनाला तर आवर्जून जातात. काही भगिनी दररोज दर्शन घेतात. अलीकडे, घरी नंदादीप लावणे शक्य होत नाही म्हणून मंदिरामध्ये पैसे देण्याची पद्धत रूढ होते आहे. नागपूरजवळ, कोराडीच्या मंदिरात, असे हजारो दीप लावले जातात. आग्याराम देवीच्या मंदिरात प्रचंड गर्दी असते. पहाटे पाच वाजतासुद्धा, दर्शनाची भलीमोठी रांग पाहिल्यावर, कळसाचे दर्शन घेऊन परत आल्याचे माझ्या स्मरणात आहे. परत आल्यावर यशवंत स्टेडियममधल्या मंदिरात आम्ही गेलो. छोटेसेच मंदिर समोर सडा, रांगोळी घातलेली. सनईची रेकॉर्ड लावलेली. प्रसन्न वातावरणात शांतपणे देवीचे दर्शन घेता येई म्हणून अनेक वर्षे नवरात्रीत एक दिवस तेथे सहकुटुंब दर्शनाला जात असू. आता त्याही मंदिराचा व्याप वाढला आहे. बाकी सर्व ठिकाणी गर्दी रेटारेटी होते, पण प्रताप नगरच्या दुर्गादेवी मंदिरात आजही, केव्हाही गेले तरी, शांतपणे दर्शन घेता येते. बाहेरच्या मंडपात प्रसादही मिळतो. ओटीसुद्धा व्यवस्थित भरता येते. येथील संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळतात. त्यांच्या सोयीप्रमाणे वेळा विभागून, त्या मंदिरात सेवा देतात. सगळी व्यवस्था चोख, वातावरणात शांत, सुरेल संगीत, मन प्रसन्न होते. शेवटी दर्शनाला जाऊन, मनाची शांतीच मिळाली पाहिजे.नागपूरमध्ये बंगाली लोकांच्या देवीचेही खूप माहात्म्य आहे. धंतोलीतील कालीमातेच्या मंदिरात, अमावास्येच्या रात्रीच मोठी पूजा असते. बाहेरगावी रहाणारे अनेक बंगाली लोक, या पूजेसाठी आवर्जून येतात. त्याशिवाय दीनानाथ हायस्कूलच्या प्रांगणात मोठी देवी बसविली जाते. तेथे मोठे प्रदर्शनही भरते. कलकत्त्यात तर, दुर्गापूजेचे खूप महत्त्व आहे. दुकानदार या पूजेच्या वेळी नवीन प्रकारचे कपडे विक्रीस आणतात. अगोदर कुणाला ती डिझाइन्स दाखवीतसुद्धा नाहीत.नवरात्रीत गुजराथी महिला गरबा नृत्य करतात. सजूनधजून त्या गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे नाचगाणे सुरू असते. ‘रंगमा रंगमा, रानी बहुचरमा खेले रंगमा’, ‘नौरात्रीमा नौ नौ दिवसमा’, किंवा ‘पंकिडा तू उड न जाना, पावा गडोरे महाकाली से मिलने चलो, गरबा खेलेंगे’ अशा पारंपरिक गीतांवर, मंदिरामध्ये गरबा खेळला जातो. पूजेचा एक भाग म्हणून केला जाणारा गरबा हळूहळू व्यावसायिक रूप घेऊ लागला आहे. हजारोंची तिकिटे लावून, विशेष सेलिब्रिटीज बोलावून गरबा खेळला, नाचला जातो. त्यामध्ये बरेच गैरप्रकारही होतात. असेच गैरप्रकार दर्शनाच्या रांगांमध्येही होतात. उत्सवाचे पावित्र्य त्यामुळे अस्तंगत होते. तरुणाईचा जोश मान्य, पण त्यातून निर्माण होणारे गैरप्रकार थांबले पाहिजेत. सण, उत्सवांमधील शुद्ध, पवित्र भावना जपली पाहिजे. देवीच्या विविध रूपांची आराधना करताना, मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे.अशा प्रकारे मनोविकारांची कुरवंडी करण्याच्या भावनेतून, देवीच्या चरणी लीन व्हावे. केवळ नऊ दिवसांचे उपवास केले म्हणजे झाले असे नसून, उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून, मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्यांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रात होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे, सामर्थ्यांचे दर्शन देवीने घडविले, तशी शक्ती, सामथ्र्य आपल्या ठायी निर्माण व्हावे, याचसाठी हा उत्सव आहे, तो त्याच पवित्र भावनेतून साजरा व्हावा.कोकणस्थ लोक अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी उकडीचा मुखवटा करून देवी उभी करतात आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून, रात्री बारा वाजेपर्यंत घागरी फुंकतात. उदवलेल्या मातीच्या घागरी, दोन हातांमध्ये धरून, त्या घागरींमध्ये प्राणशक्ती फुंकीत ‘फूं फूं’ करून, तालावर नाचणे म्हणजेच तल्लीन होणे. तो उदाचा सुगंध, हातातील मातीची घागर हातून निसटू नये यासाठी सांभाळणे आणि तिच्यातील उदाचा गंध मस्तकात भरून घेत, त्यामध्ये फुंकर घालणे, यासाठी लागते ती तल्लीनता, एकाग्रता. ‘घागरी घुमताती, आनंदे नाचताती, महालक्ष्मी आली राती,’ त्या एकाग्रतेनेच, त्या शक्तिरूपाचा जागर केल्यास, आपण शक्तिमान होऊ, हा विश्वास बाळगून, उत्सव साजरे केले पाहिजेत, असे म्हणावेसे वाटते.