गुढीपाडवा (Hindi Essay Writing)

Created with Sketch.

गुढीपाडवा


 

चैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस होय. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन, विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस ‘चैत्र शुध्द प्रतिपदा’ हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढया, तोरणे उभारून रामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.हिंदू लोक कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ करण्यास शुभ दिवस पहातात. या दृष्टीने वर्षातील काही ठराविक दिवस हे शुभ समजले जातात. साडेतीन मुहूर्त या नावाने ते प्रसिध्द आहेत. गुढीपाडवा हा दिवस या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन घरात रहायला जाणे, किंमती वस्तूंची किंवा स्थावराची खरेदी, सोन्याची खरेदी वगैरे सर्व गोष्टींच्यासाठी हा दिवस शुभ मानतात. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो व नवे पंचांगही सुरू होते. शालिवाहन शकाची (हिंदू कालगणनेची) सुरूवात याच दिवशी झाली. या दिवसाची सुरुवात कडुलिंबाची पाने खाण्याने करण्याची प्रथा आहे. कडुनिंबाच्या झाडाला या सुमारास नवीन पालवी फुटलेली असते. त्याची कोवळी पाने काढून त्यात गूळ, जिरे, चवीपुरते मीठ व लिंबू घालून वाटून गोळी बनवितात. सकाळी उठल्याउठल्या तोंड घुवून ती गोळी खाण्याची पध्दत आहे. कडुलिंब हा आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार अत्यंत आरोग्यकारक व कीटकनाशक आहे म्हणून ही प्रथा आहे.या दिवशी घराच्या पुढील अंगणातील जमीन गाईच्या शेणाने सारवून पाच पांडवांच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या भोवती रांगोळी काढली जाते. या ठिकाणी गुढी उभारतात. गुढीची षोडशोपचारे पूजा केली जाते. गुढी उभारण्यापूर्वी गुढीला (काठीला) तेल लावून ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतात. त्याला हळद-कुंकू वाहतात. गुढीकरीता पितळेचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाचा डहाळा, साखरेची गाठी, जरीचा खण, कापड अथवा पातळ, फुलांची माळ एवढे साहित्य घेतात. काठीच्या टोकाला जरीचा खण किंवा रंगीत कापड घट्ट बांधतात व त्यावर भांडे पालथे घालतात. त्यावर कडुलिंबाचा डहाळा व गाठी घालतात. घराच्या छपरावर किंवा पुढील दर्शनी भागावर ही काठी अशातऱ्हेने बांधतात की रस्त्यावरून ती सहज दिसावी. ही रंगीत कापडने शोभणारी गुढी म्हणजे रामाच्या स्वागतासाठी उभारलेल्या शुभध्वजाची प्रतिक असते. गुढी उभारल्यावर तिला हळद-कुंकू वाहण्यात येते. घराच्या प्रवेशदाराला आंब्याची डहाळी अथवा तोरण लावतात. नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करतात. ही उभारलेली गुढी सायंकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही उतरवतात. गावात रामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण केली जाते. हळद-कुंकू, अक्षता वाहून मगच गुढी उतरवली जाते. या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत राममंदिरात कीर्तनाला प्रारंभ होतो.या दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाटी-पूजन (सरस्वती पूजन) असते. पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वती काढून पाटीची अर्थात विद्येची पूजा केली जाते.या दिवशी मुख्यत्वे करून पुरणपोळी, पुरणाची आमटी (कटाची आमटी), भजी-पापड-कुरडया वगैरे तळण, शेवयांची खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This is a free online math calculator together with a variety of other free math calculatorsMaths calculators
+